किमया !!
एखाद्या जुन्या गाण्याने आपल्याला नव्याने भुरळ पाडावी आणि मग पुढचे काही दिवस तेच गाणं वारंवार ऐकत रहावं हे आम्हा भारतीय संगीत प्रेमींसाठी अजिबात नवीन नाही. आणि असं गाणं ५० वर्षांपूर्वीचे आहे असं सांगितलं तरी आपल्याला काही आश्चर्य ही वाटणार नाही किंबहुना माझ्या पिढीला ती पटणारीच बाब असेल.
आज असेच झाले मराठी सारेगम कारवाँ वर एक गाणं कानावर पडलं आणि त्या गाण्याने भुरळच घातली बघा ... तंत्रज्ञानाचे आभार अशासाठी कि आता काहीच कष्ट न घेता गाणं वारंवार ऐकता तर येतच पण त्याबद्दलची संपूर्ण माहितीही तात्काळ मिळूं शकते. एवढेच नव्हे तर या लेखाखेरी मी ते गाणं attach सुद्धा करू शकणार (करणार) आहे. आता या सोयीची सुद्धा सवय झाली आहे. हे सगळं किती अलौकिक आणि समाधानकारक आहे. कुण्या एकेकाळी म्हणजे अगदी ९० साली सुद्धा मी रेल्वे स्टेशनच्या स्टॉलवर एखादं गाणं ऐकण्यासाठी चक्क गाडी सोडलेली मला चांगलं आठवतंय. या शब्दांच्या पलीकडले माझ्या मनातले भाव ज्यांना कळतायेत त्यांच्यासाठी या गाण्यांची, कलाकृतींची किंमत कितीही वेळा ऐकली तरी कधीच आटणार नाही. असो तर आज घडले असे ...
एकीकडे सारेगम कारवाँ चालू होता आणि एकीकडे माझे काम आणि अचानक या गाण्याला सुरुवात झाली. सगळ्यात पहिल्यांदा आशाचा सूर कानावर पडला आणि सगळं लक्ष त्याकडे वेधलं गेलं. अशी किमया असलेल्या काही गाण्यांपैकी हे एक. जसजसं गाणं पुढे सरत होतं तसतसा माझ्या भोवती त्याचा विळखा घट्ट होत होता. प्रत्येक शब्द, स्वर कानावर पडत असताना त्या तेवढ्या वेळात मला पुन्हा एकदा धन्यता वाटली आणि या आनंदासाठी कुणाकुणा विषयी कृतज्ञता व्यक्त करू असा विचार मनात आला.
तसं पाहिलं तर १९६० हा भारतीयच नव्हे तर जगभरातल्या संगीतासाठी सुवर्णकाळ मानला जातो. भारतीय चित्रपट संगीताने तर तेव्हा कळस गाठला. प्रामुख्याने तिथे काम करणारी मंडळी हि बंगाली आणि मराठी होती आणि त्यात अग्रेसर गायिका म्हणजे लता आणि आशा मंगेशकर. त्या मराठी भाषिक असल्यामुळे आपण इतर भारतीयांपेक्षा एका दृष्टीने अधिकच भाग्यवान ठरलो नाही का. बाबूजी, वसंत प्रभू , वसंत पवार, दशरथ पुजारी या सारख्या संगीतकारांना किती स्वछंदी काम करायला मिळाले असेल असं म्हणायला हरकत नाही. तसेच माडगूळकर, पी सावळाराम, रमेश अणावकर आणि अनेक मराठी गीतकारांच्या शब्द संपदेला हे वरदानच ठरलंय असाही विचार मनात येतो. आणि या साऱ्यांचा संगम घडवुन आणून आणि आपल्यात याचा आस्वाद घेण्यासाठीची रसिकता पेरून या ईश्वराने जी किमया केली आहे त्याच्याच विषयीची कृतज्ञता मनात बाळगून हे गाणं ऐकूया चला. या चैत्र प्रतिपदेपासून आपल्या साऱ्या दिवसांची सुरुवात अशीच आनंदमयी आणि मंगलमयी सुरांनी होवोत हि पाडव्याची शुभेछा. धन्यवाद